मुल तालुक्यात काँग्रेसला धक्का वंचितचे शेकडो कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये दाखल

मूल_

काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का देत मुल आणि बल्लारपूर ballarpur तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.  काँग्रेससाठी ही घटना राजकीय दृष्टिकोनातून मोठी धक्का मानली जात आहे, तर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

मुल तालुक्यातील राजगड गावाचे सरपंच रविंद्र मनोहर चौधरी आणि अन्य काही महत्त्वपूर्ण सदस्यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत विविध समाजातील नेतेही भाजपकडे वळले आहेत. यामध्ये भोई समाजाचे ऋषी पेठकर, माळी समाजाचे संकेत गायधने, माना समाजाचे प्रभाकर चौधरी यांचा समावेश आहे. या सर्वांनी मुनगंटीवार यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

या प्रवेश सोहळ्यादरम्यान मुनगंटीवार यांनी स्थानिक जनतेला संबोधित करताना भाजपच्या विकासात्मक कार्यांवर भर दिला. “विकास हा आपल्या पक्षाचा मूलमंत्र आहे. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आणि यामुळेच स्थानिकांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला,” असे मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यांनी भाजपमध्ये नव्याने सामील झालेल्या सदस्यांचे स्वागत केले व विकास प्रक्रियेतील योगदानाचे आवाहन केले.

बल्लारपूरमधील काँग्रेसला गळती:
बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत मतभेद आणि असंतोषाने गडबड उडाली आहे. गेल्या आठवड्यात शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद वर्मा यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि जाचामुळे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान यांच्यासह शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपकडे वळले. यामुळे बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

चार दिवसांपूर्वी काटोली गावातील संपूर्ण ग्रामपंचायतने काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच राजेश ढुमणे, उपसरपंच कवडू वागाडे आणि सदस्य अरुण गडकर यांनी भाजपचा स्वीकार केला. ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या असंतोषाची लाट वाढली असून, स्थानिकांमध्ये भाजपबद्दल वाढलेली विश्वासार्हता यामुळे स्पष्ट होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचा मोठा गट भाजपमध्ये:
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष रमेश लिगमपल्लीवार यांच्यासह २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. वंचित बहुजन आघाडीतील सदस्यांचे भाजपकडे वळणे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेतृत्वासाठी एक गंभीर आव्हान मानले जात आहे.

मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील विविध विकासकामे, शिस्तबद्ध संघटना व पक्षाचा जनसेवेमध्ये असलेला कटाक्ष यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना भाजपकडे आकर्षित केले आहे. या प्रवेश सोहळ्यादरम्यान भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, विसापूर शाखा अध्यक्ष गणेश टोंगे आणि अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत विकास हाच मुख्य मुद्दा असेल, असा विश्वास नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. “सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग स्वीकारणे हे योग्य आहे,” असे मत वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांनी मांडले. यामुळे बल्लारपूर आणि मुल तालुक्यात भाजपचा प्रभाव अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *